दिल्ली News Update : अमित शहा यांना भेटल्यानंतर काय बोलले मुख्यमंत्री ?

लवकरच महाराष्ट्राला नवे सरकार मिळेल याबाबत आपण आश्वस्त आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवरुन दिली. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हे भाष्य केलं. सत्तेच्या समीकरणासंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतर अकराव्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.
भेटीचा विषय अवकाळी पाऊस नुकसानग्रस्तांच्या मदतीचा असला तरी त्यात राज्यातील सत्ता स्थापनेच्या मुद्यावरही चर्चा झाली मात्र त्यावर ते अधिक बोलले नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना अवकाळी पाऊस नुकसानीसोबत सत्ता स्थापनेबाबत भाष्य केलं.
राज्यात नवं सरकार लवकरच स्थापन होईल हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळला. तसंच सरकार कधी आणि कसं स्थापन होणार हे देखील सांगितलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत युतीमधील तिढा लवकरात लवकर सुटण्याची शक्यता नाही. भाजप नेतृत्त्वाने आक्रमक राहण्याचा सल्ला दिल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.