पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने कल्याणीनगर येथील एका हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (३ नोव्हेंबर) उशिरा उघडकीस आली. राजेश माणिकराव सोनवणे (वय ३९, रा. सोमवार पेठ) असे आत्महत्या करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे नावे आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे गुरुवारी रात्री कल्याणीनगरमधील एका हॉटेलमध्ये आले होते. त्याठिकाणी त्यांनी एक खोली भाडेतत्त्वावर घेतली होती. शुक्रवारी दुपारपर्यंत खोलीचा दरवाजा बंद असल्याने आणि आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेल प्रशासनाने याची माहिती येरवडा पोलिसांना दिली. येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा उघडला असता सोनवणे बेडवर झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. सोनवणे यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांना तात्काळ ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. सोनवणे यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजू शकलेली नाही. येरवडा पोलिस तपास करीत आहेत.