बिहारच्या औरंगाबादेत छटपूजेदरम्यान चेंगरा-चेंगरी , दोन मुलांचा मृत्यू

बिहारमधील औरंगाबादेत छट पूजेच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर समस्तीपूर जिल्ह्यातील घाटाजवळ मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
हाती आलेल्या बातमीनुसार बिहारच्या औरंगाबादमध्ये शनिवारी छठ पूजावेळी घाटावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या लोकांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्यांत पाटणाच्या बिहटा या गावचा रहिवासी असलेला सहा वर्षीय मुलगा आहे. तर भोजपूर येथील १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सूर्याकुंड येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि पोलीस अधीक्षक दीपक बर्णवाल यांनी मृत मुलांच्या कुटंबीयाची भेट घेतली. छठ पूजावेळी खूप मोठी गर्दी झाल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्याने दिली.
दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना लवकर आर्थिक मदत जाहीर केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. तर राज्यातील समस्तीपूर मध्ये झालेल्या अन्य एका घटनेत छठ पूजा घाटावर मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य काही जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एस डी आर एफ ने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले आहे.