Aurangabad : औरंगाबाद ते दिल्ली विमान सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दररोज १५० प्रवाशांची ये-जा सुरू

औरंंंगाबाद : दस-यापासून स्पाईस जेटने दिल्ली औरंगाबाद दिल्ली विमानसेवा सुरू केली आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातून आता दररोज १४० ते १५० प्रवासी औरंगाबाद ते दिल्ली व दिल्ली ते औरंगाबाद असा प्रवास करीत असल्याची माहिती स्पाईस जेटच्या सुत्रांनी दिली आहे.
जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान बंद झाल्यापासून औरंगाबादहुन मुंबई -दिल्ली ये-जा करण्यासाठी एकमेव एअर इंडियाच्या विमानसेवेचा आधार होता. परंतु ही विमानसेवा सायंकाळीच होती त्यामुळे दिल्लीहुन औरंगाबाद-मुंबईला ये-जा करणा-यांना अध्र्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागत होती. अखेर चार वर्षानंतर दिल्ली औरंगाबाद दिल्ली अशी विमानसेवा स्पाईस जेटची औरंगाबादहुन सुरू झाली.
दरम्यान, चिकलठाणा विमानतळावरून २१ ते २७ जुलैदरम्यान हज यात्रेकरून औरंगाबादहुन थेट जेद्दाहला रवाना झाले. हज यात्रेसाठी दिल्लीहुन औरंगाबादला येणा-या विमानातून यंदा प्रवासी वाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे सात दिवसासाठी सकाऴच्या सत्रात दिल्ली ते औरंगाबाद विमानसेवा प्रवाशांसाठी उपलब्ध झाली होती. या विमान सेवेला प्रवाशांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. आठवडाभरात जवळपास ६०५ प्रवासी शहरात दाखल झाले होते. त्यामुळे त्याच वेळी सकाळच्या वेळी दिल्लीसाठी विमानसेवा किती गरजेची आहे हे स्पष्ट झाले होते.
उद्योग,पर्यटन क्षेत्राला दिलासा
सकाळच्या वेळेत रोज १४० ते १५० प्रवासी दिल्लीला जात आहेत. तर तेवढेच प्रवासी औरंगाबादला येत आहेत. त्यामुळे शहरातील उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा दिलासा मिळत आहे.