अल – बगदादीला ठार मारण्याच्या मोहिमेला मानवाधिकार कार्यकर्ती कायला मुलरचे नाव

अमेरिकेने आयसीस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार मारण्याच्या मोहिमेला ‘ऑपरेशन कायला मुलर’ असे नाव दिल्याचे वृत्त आहे . या नावाने बगदादीविरोधी मोहीम हाती घेत अमेरिकेने बगदादीचा खात्मा केला आहे. अमेरिकेने या ऑपरेशनला ज्या तरुणीचं नाव दिलं ती कायला मुलर अमेरिकन नागरिक होती. बगदादीने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केली होती. त्यामुळेच अमेरिकेने तिच्या नावानं हे ऑपरेशन केलं असल्याचं उघड झालं आहे.
कायला मुलर ही मानवाधिकार कार्यकर्ती होती. पदवी शिक्षण घेतल्यानंतर ती २०१२मध्ये तुर्कस्थानात आली होती. त्यानंतर सीमेपलिकडे सीरियाला गेली होती. देशांतर्गत युद्धाला बळी पडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी ती सीरियाला गेली होती. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डसच्या मदतीने सुरू असलेल्या धर्मदाय रुग्णालयातील काम संपवून जात असताना २०१२मध्ये आयएसच्या अतिरेक्यांनी तिचं अलेप्पो येथून अपहरण केलं होतं. आयएसच्या ताब्यात असताना कायलाने तिच्या कुटुंबीयांना पत्रही लिहिलं होतं. आयएसच्या ताब्यातून माझी सोडवणूक करण्यासाठी तुम्ही आयएसशी कोणतीही तडजोड करू नका. तुम्ही खंबीरपणे आयएसचा मुकाबला करावं असं तुम्हाला वाटत असेल. मी सध्या तेच करतेय, असं कायलाने या पत्रात म्हटलं होतं.
दरम्यान, जॉर्डनमध्ये एका हवाई हल्ल्यात कायलाचा मृत्यू झाल्याचा आयएसने दावा केला होता. मात्र जॉर्डनने हा दावा फेटाळून लावला होता. २०१५मध्ये कायलाच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून कायलाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. कायलाचा मृत्यू झाला आहे, हे सांगताना आम्हाला अत्यंत दु:ख होत असल्याचं कायलाच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं.
अमेरिकेने बगदादीच्या ठिकाण्यांवर हल्ला करून त्याला ठार केलं होतं. शनिवारी बगदादी मारल्या गेल्याच्या वृत्ताला रविवारी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला होता. या हल्ल्यात आयएसचा दहशतवादी अबू हसन अल-मुहाजिर सुद्धा मारला गेल्याचं सांगण्यात येतं. मुहाजिर हा बगदादीचा उत्तराधिकारी असल्याचं मानलं जात होतं. एका तेलाच्या टँकरवरून तो उत्तर सीरियाला जात होता, त्यावेळी झालेल्या हवाई हल्ल्यात तो मारला गेल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, बगदादीला मारल्याचे व्हिडिओ आणि फोटो लवकरच जारी करण्यात येणार आहे. ट्रम्प यांनीच तशी माहिती दिली आहे. यात एअर फुटेज, जवानांची लँडिंग आणि बगदादच्या गुहेत घुसण्यापासूनच्या गोष्टींचा समावेश असल्याचंही सांगण्यात येतं.