महाराष्ट्राचं राजकारण : भाजप -शिवसेनेची बैठक रद्द , मुख्यमंत्र्यांनी इतका फणा काढण्याची गरज काय ? : संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut, Shiv Sena: Discussions between BJP-Shiv Sena were scheduled for 4 pm today. But if the CM himself is saying that the '50-50 formula' was not discussed then what will we even talk about? On what basis should we talk to them? So Uddhav ji has cancelled today's meeting pic.twitter.com/duyYQpCQtn
— ANI (@ANI) October 29, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या ५०-५० च्या फोर्मुल्याचे रोखठोक उत्तर देताना असा कुठलाही फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असे सांगून पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होईल असा दावा केल्याची वार्ता कानावर पडताच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी इतका फणा काढण्याची गरज काय ? अशा शब्दात संतप्त प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाने आयोजित केलेली बैठक उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्याचे वृत्त आहे.
फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर शिवसेनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
संजय राऊत म्हणाले कि , “भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्रीच जर स्वतः म्हणत असतील की फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नाही तर आम्ही या बैठकीत कशावर चर्चा करायची. कशासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायचं. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठकच रद्द केली आहे.”
‘निवडणुकीपूर्वी जे ठरलं होते तेच द्यायचे आहे. आम्ही काहीही चुकीचे मागत नाही, असे म्हणत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही’, आमची समजूत काढायची गरज नाही आणि आम्ही काही हट्टाला पेटलेलो नाही. सामनामधूनही मी पक्षाचीच भूमिका मांडतो. कॉंग्रेस –राष्टवादीच्या विरोधात लिहिल्यानेच २०१४ ला महाराष्ट्रात सत्ताबदल झाला हे त्यांनी विसरू नये. आमचं जे ठरलं होतं ते सोडून आम्ही वेगळं काय मागतो आहोत?” असाही प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी विचारला.
शिवसेनेला ५०-५०च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भारतीय जनतापक्षाने कधीन दिलेले नव्हते, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आपण स्वत: अमित शहा यांना फोन करून असे आश्वासन शिवसेनेला दिले का, असे विचारले असता, शहा यांनी आपण असे आश्वासन शिवसेनला दिले नसल्याचे शहा यांनी म्हटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर संजय राऊत यांनीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्यांच्याकडे १४५ आमदारांचा पाठिंबा आहे, असा कुणीही सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनू शकतो, उद्या एकनाथ खडसेही तसे म्हणू शकतात, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही तसे म्हणू शकतात आणि पवार साहेबही तसे म्हणू शकतात, असेही राऊत म्हणाले. दरम्यान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर पक्षाची भूमिका काय आहे, ते फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच बोलतील असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
राऊत म्हणाले, मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण जर फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नव्हती असे ते म्हणत असतील तर मला वाटतं आपण सत्याची व्याख्याच बदलायला हवी. कारण, मुख्यमंत्री ज्याबाबत बोलत आहेत त्यावर भाजपा आणि शिवसेनेमध्ये काय चर्चा झाली हे सर्वांना माहिती आहे, माध्यमांचे प्रतिनिधीही त्याठिकाणी उपस्थित होते.
मुख्यमंत्री स्वतः फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर बोलले आहेत. उद्धव ठाकरेंनीही हे वारंवार सांगितले आहे. अमित शाहांच्या समोर हे बोलणं झालं आहे. जर आता ते म्हणत असतील की अशी कोणती चर्चाच झाली नव्हती तर मी अशा विधानाला प्रणाम करतो. कॅमेऱ्यासमोर ते काय म्हणाले हेच ते नाकारत आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी म्हटले आहे.