महाराष्ट्राचं राजकारण : भाजपचे खा . संजय काकडे म्हणाले सेनेचे ४५ आमदार संपर्कात तर मुख्यमंत्र्यांनीही केला हा खुलासा

सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे वारे वाहत असून शिवसेनेच्या हातात ५६ जागा असल्याने भाजपने आमचे ऐकलेच पाहिजे असा आग्रह धरलेल्या सेनेला आव्हान देणारे वक्तव्य भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केले असल्याने त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा चालू आहे .
शिवसेनेच्या ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काकडे यांनी केला आहे . त्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी खासदार संजय काकडेच माझ्या संपर्कात नसल्याचे सांगून हास्यविनोद केला. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खा. काकडे यांनी हा दावा केला आहे. दरम्यान, आता यावर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
खा . काकडे यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी या ४६ आमदारांनी केली आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असू द्या. आपण सर्वांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. १९९५ मध्ये शिवसेनेला अधिक जागा होत्या. त्यावेळी मनोहर जोशी हे साडेचार वर्ष मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे हे साडेचार वर्ष उपमुख्यमंत्री होती, तसाच फॉर्म्युला कायम राहिल. गेली पाच वर्ष आम्ही जसं सरकार चालवलं तसंच यापुढेही चालवावं, अशी त्या आमदारांच्या मनात इच्छा आहे.
दरम्यान, शिवसेना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाटपाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असली तरी त्याला स्पष्ट भाषेत उत्तर देताना पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असून ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि , भाजपाच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल शिवसेनेच्या काही मागण्या मेरिटवर तपासून पाहू असेही ही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर आपला कितीही दावा सांगितलं तरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आधीच महाराष्ट्रातील आगामी सरकार भाजपच्या नेतृत्वातीळ असेल आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हे सांगितल्याने या विषयावरून भाजप माघार घेईल असे काही ठामपणे म्हणता येत नाही.