दारू न पिण्याचा सल्ला देणाऱ्या दारुड्या पित्याने १७ वर्षीय मुलीला घातली गोळी

पित्याला दारू पिण्यापासून रोखणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा उत्तर प्रदेशातील संभल मध्ये एका दारुड्या पित्याने गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांना दारू पिण्यापासून रोखत असल्याच्या कारणावरुन त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपी पोलिसाने दिली आहे. आरोपीच्या पत्नीने १५ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर आरोपी दारुच्या आहारी गेला. पोलिसांनी दारुड्या पित्याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले कि , उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील बंदरई या गावी राहणारे ५२ वर्षीय नेम सिंह यांनी शनिवारी रात्री उशीरा त्याची मुलगी नितेश हिची पॉइंट ब्लँक रेंजने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत जखमी झालेल्या मुलीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तिला मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांनी गोळीचा आवाज ऐकून पोलिसांना घटनेची माहिती दिली. नेम सिंहच्या पत्नीने १५ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर नेम सिंह दारुच्या आहारी गेला. या सवयीमुळे त्याला आपल्या शेतीचा एक भागसुद्धा विकावा लागला होता. त्याचा मुलगा गौरव आपल्या वडिलांना दारु पिण्यापासून रोखत असे. त्यात त्याची बहिण तिला साथ देत असे.
दोन वर्षांपूर्वी गौरव आपल्या पत्नीसह दिल्लीला गेला. नेम सिंह आपला लहान मुलगा सौरभ आणि मुलगी नितेश सोबत राहत होता. पोलीस अधिकारी प्रवीण कुमार सोलंकीने सांगितले की, “ज्यावेळी आरोपीने त्याच्या मुलीवर गोळी झाडली त्यावेळी त्याचा मुलगा सौरभ घरी नव्हता. आम्ही नेम सिंहला अटक केली आहे. त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या देशी बंदुकसुद्धा ताब्यात घेतली आहे.”