पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यंदाची दिवाळीही जवानांसोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीर राज्यात दाखल झाले असून ते या ठिकाणी ते जवानांसोबत आपली दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबर मोदी त्यांच्यासोबत काही वेळही घालवणार आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये दौऱ्यावर आले आहेत.
यापूर्वी देखील पंतप्रधान मोदींनी २०१८ मध्ये उत्तराखंडमध्ये भारत-चीन सीमेवर बर्फाळ प्रदेशात लष्कर आणि इंडो-तिबेटिअन सीमा सुरक्षा बलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. तर २०१४ मध्ये पहिल्यांदा पतंप्रधान बनल्यानंतर मोदींनी जवानांसोबत सियाचीनमध्ये दिवाळी साजरी केली होती.
२०१५ मध्ये त्यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर पंजाब सीमेचा दौरा केला होता. हा दौरा भारत-पाकिस्तानच्या १९६५ मधील युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर झाला होता. त्यानंतर पुढच्या वर्षी मोदींनी हिमाचल प्रदेशात सर्वांच उंचीवरील पोस्टवर आयटीबीपीच्या जवानांसोबत काही वेळ व्यतीत केला होता. पंतप्रधान मोदींनी २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरच्या गुरेज भागात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. यावेळी ते सीमेवरील भागात जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.