बहिणीची छेड काढणाऱ्या चार तरुणांनी केलेल्या हल्ल्यात भावाचा जागीच मृत्यू

बहिणीची छेड काढणाऱ्यांना समज दिल्याच्या रागातून चार युवकांनी धारदार शस्त्राचे वार करून एका तरुणाचा भर दिवसा चौकात खून केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर शहरात घडली आहे. बहिणीची छेड काढण्यावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील घुटकाळा भागातल्या नेहरू शाळेसमोर हि घटना घडली.
या विषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , त्याच्या बहिणीची छेड काढल्यामुळे या भावाने काही तरुणांना दम भरीत शिवीगाळ करून या पुढे असे न करण्याबाबत समज दिली होती. याचा राग मनात ठेवत या चार तरुणांनी भावाचाच काटा काढला. अक्षय बलवंत मुन असे या २३ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. या चार आरोपी तरुणांनी अक्षयच्या बहिणीची छेड काढली होती. हा सगळा प्रकार बहिणीने अक्षयला सांगितला त्यामुळे रंगात येऊन त्याने आरोपींना शिवीगाळ करून समज दिली होती.
त्याचा राग आरोपी तरुणांच्या मनात होता. संधी साधून या चार युवकांनी अक्षयला नेहरू शाळेसमोर चौकात गाठले आणि भर दिवसा त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. शरीरावर अनेक जबर वार झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला.
भर रस्त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. भावाला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर अक्षयच्या बहिणीने आणि कुटुंबाने हंबरडा फोडला. या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला . दरम्यान पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.