शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ‘भारतरत्न’ देण्याची काँग्रेसची मागणी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी, शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात यावं अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत तिवारी यांनी पत्र लिहिलं असून त्यामध्ये, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना भारतरत्न पुरस्कारासह अधिकृतरित्या ‘शहीद-ए-आजम’ म्हणून घोषित करावं, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे. याशिवाय, “पंजाबमधील मोहालीस्थित विमानतळाचं ‘शहीद-ए-आजम भगतसिंग विमानतळ’ असं नामकरण करावं, यामुळे १२4 कोटी भारतीयांना आनंद होईल”, असंही तिवारी म्हणालेत. पंतप्रधान मोदींना पाठवलेलं हे पत्र तिवारी यांनी ट्विटरवरही शेअर केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून करण्यात आलेली ही मागणी अधिक महत्त्वाची ठरते.