Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप – सेना : विधानसभेच्या जागांबरोबरच मतांच्या टक्केवारीतही मोठी घट , महायुतीला कौल मिळाला पण मताधार गेला …

Spread the love

लोकसभा निवडणुकीतील मतांच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसच्या मत टक्क्यात फारसा बदल झाला नसला तरी शिवसेनेची एकूण मते आणि मतांची टक्केवारी मात्र घटली असल्याचे चित्र आहे. तुलनेत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये वाढ झाली असून  छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मतांमध्येही वृद्धी झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीत दोन जागांचा फरक असला तरी राष्ट्रवादीची एकूण मते सेनेपेक्षाही जास्त आहेत.

सर्वाधिक १०५ जागा जिंकलेल्या भाजपला एक कोटी ४१ लाख मते मिळाली. भाजपच्या मतांची टक्केवारी २५.७१ एवढी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला सुमारे दीड कोटी मते मिळाली होती आणि त्यांची टक्केवारी २७.६ इतकी होती.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला १ कोटी २५ लाख मते मिळाली होती आणि त्यांची टक्केवारी २३.३ एवढी होती. विधानसभेत शिवसेनेला ९० लाख, ४९ हजार मते मिळाली. त्यांची टक्केवारी १६.४१ इतकी आहे.

तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीला ९२ लाख १६ हजार मते मिळाली असून त्यांची टक्केवारी १६.७१ आहे. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला दोन जागा जास्त मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादीची एकूण मते शिवसेनेपेक्षा जास्त आहेत. लोकसभेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये वाढ झाली. लोकसभेत राष्ट्रवादीला १५.५ टक्के (८३ लाख, ८७ हजार) मते मिळाली होती.

लोकसभा आणि विधानसभेतील काँग्रेसच्या मतांमध्ये फारसा बदल झालेला नाही. विधानसभेत ४४ जागा मिळालेल्या काँग्रेसला १५.८७ टक्के मते (८७ लाख, ५२ हजार) मिळाली आहेत. लोकसभेच्या वेळी फक्त एक जागा मिळालेल्या काँग्रेसला १६.३ टक्केमते मिळाली होती.

दरम्यान वंचित आघाडी, अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांना सर्वांना मिळून एक कोटी मते मिळाली आहेत. त्यांची टक्केवारी १८.६२ एवढी आहे. छोटे पक्ष, अपक्ष आणि इतरांना लोकसभेत १४.६ टक्के मते मिळाली होती. कल्याण ग्रामीण ही एक जागा जिंकलेल्या मनसेला राज्यात एकूण २.२५ मते मिळाली आहेत. बसपच्या मतांमध्ये मात्र कमालीची घट झाली. बसपला राज्यात सरासरी तीन ते चार टक्के मते आतापर्यंत मिळत होती या निवडणुकीत मात्र जेमतेम ०.९२ टक्के मते बसपाला मिळाली आहेत तर दोन जागा मिळालेल्या समाजवादीला ०.२२ टक्के मते मिळाली.  दोन जागा जिंकलेल्या एमआयएमला मात्र मागच्या वेळे प्रमाणेच १.३४ मते मिळाली.

वंचित आघाडीला लोकसभा निवडणुकीत ४० लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्या तुलनेत विधानसभेत मतांचे प्रमाण २५ टक्क्यांवर आले आहे. एमआयएमशी युती तोडल्याचा मोठा फटका नाही म्हटले तरी वंचितही बसला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!