भाजपकडून मुख्यमंत्रीपदात बदल नाहीच , सर्व आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याच पाठीशी : चंद्रकांत पाटील

BJP Maharashtra President, Chandrakant Patil: BJP has called legislative party meeting on 30th October at Vidhan Bhavan to elect leader in the house. All 105 MLAs to attend the meeting. (File pic) pic.twitter.com/dMd9fq86iW
— ANI (@ANI) October 26, 2019
भाजपाच्या जागा कमी झालेल्या नाहीत. २०१४ साली आम्ही २६० जागा लढवल्या त्यात १२२ जिंकल्या आता १५० लढवून १०६ जिंकलो. जिंकण्याचा रेट मागे ४७ टक्के होता तो आता ६६ टक्के आहे. मतांमध्ये फक्त अर्धा टक्क्याची घट झाली आहे. त्यामुळे जागा कमी झालेल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने चांगलं यश मिळवलं असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, उदयनराजे यांचा पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. केंद्रीय नेतृत्व त्यांची योग्य ती काळजी घेईल.
पुण्यात कोथरुडमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बदलत्या परिस्थितीत तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर तुम्ही स्वीकारणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची स्थापना १९६० साली झाली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले सगळयात चांगले मुख्यमंत्री आहेत अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. राज्यात पुन्हा एकदा बिगर काँग्रेसी सरकार आले. ही सोपी गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दूरदृष्टी असून ते एक पारदर्शक नेते आहेत. त्यामुळे तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आम्हा सर्वांची इच्छा आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे मराठा मुख्यमंत्री व्हावा अशी आमदारांची मागणी आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आता थेट स्टॅटस्टिक मांडता येणार नाही.
भाजपाच्या विजयी आमदारांची ३० तारखेला विधान भवनात बैठक घेतली जाणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भाजपाचे १०५ विजयी आमदार या बैठकीला हजर राहतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.