हिंदू महासभेच्या नेत्याची गळा चिरून हत्या

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची भरदिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी तिवारी यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा गळा चिरला, त्यानंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली आहेत.
तिवारी यांचं लखनऊमधील नाका परिसरातील खुर्शीद बाग येथे कार्यालय आहे. दोन व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात आले. दोघांकडेही मिठाईचे डबे होते. त्यात धारदार चाकू होते. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी तिवारी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत चहा देखील घेतला. त्यानंतर त्यांचा गळा चिरून ते दोघे फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच, तिवारी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. हत्येपूर्वी त्यांना एक फोनही आला होता. हा फोन नेमका कोणी केला होता? हल्लेखोर परिचितांपैकी होते का?, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तिवारी यांना आलेल्या मोबाइल क्रमांकही ट्रेस केला जात आहे.