सहा पोलिसांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या कुख्यात नक्षवद्याला झारखंड पोलिसांकडून पुण्यात अटक

कुख्यात नक्षलवादी साहेब राम हांसदा उर्फ आकाश मुर्मूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतून या नक्षलवाद्याला झारखंड पोलिसांनी अटक केली आहे. २०१३ साली नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला होता. यामध्ये दुमका जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमरजित बलियार यांच्यासह सहा पोलीस शहीद झाले होते. या हल्ल्या प्रकरणी साहेब राम हांसद मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते.
साहेब राम हांसदा हा चाकण आळंदी फाटा येथील श्री प्रेसिंग कंपनीत काम करत होता. १५ दिवसांपूर्वीच तो या कंपनीत रुजू झाला होता. पण ( सोमवारी ) झारखंड पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.
सध्या पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना नक्षलवादी कारवाया करण्यासाठी तरुण याच परिसरात रोजगाराच्या माध्यमातून वास्तव्य करत आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.