“मिर्ची लगी ” अखेर प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स , १८ तारखेला होणार चौकशी , मोदींची दोस्तीही कमला आली नाही !!

अखेर ” मिरची ” प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयानं समन्स पाठवले आहेत. ईडीच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला पटेल यांची चौकशी होणार आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळं ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे, असं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिशय जवळीक आहे . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रचारात मोदींच्या फ़ोटोचाही वापर केला होता परंतु त्यांची हि जवळीक एकतर्फी असल्याचे आता सिद्ध होते आहे. पटेल अडचणीत येणार हे माहित असल्यामुळेच कि काय पवर्णनी त्यांना २०१४ च्या निवडणुकीपासून दूर ठेवले आहे हे विशेष !!
प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर आले असून, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या एका साथीदाराशी प्रफुल्ल पटेल यांनी आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू आहे. ‘मिर्ची’ नावाने कुख्यात असलेल्या दिवंगत इकबाल मेमन याच्याशी पटेल यांच्या कुटुंबाच्या कंपनीने आर्थिक व्यवहार केला होता, असा आरोप झाला होता. पटेल कुटुंबाची मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ‘मिर्ची’ यांच्यात झालेल्या कायदेशीर कराराचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. पटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीकडून ‘मिर्ची’ ला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीतील नेहरू तारांगणच्या समोर प्राइम लोकेशनला आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली रहिवासी आणि व्यावसायिक इमारत बांधली. या इमारतीचे नाव ‘सीजे हाउस’ असे आहे, अशी माहिती समोर आली होती.
या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांत मुंबईपासून ते बेंगळुरूपर्यंत ११ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. यात छाप्यांमध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला आहे. डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रे जप्त केल्यानंतर ईडीने १८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. इक्बाल मेमन म्हणजे ‘मिर्ची’ची पत्नी हजरा मेमन यांच्या नावे असलेला प्लॉट पटेल कुटुंबाच्या कंपनीच्या नावे करण्यात आला, यासंबंधीची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत, अशी माहिती समोर आली होती.
२००६-०७ मध्ये झालेल्या या व्यवहारानुसार, सीजे हाउस इमारतीमधील दोन मजले मेमन कुटुंबाला देण्यात आले होते. इमारतीच्या या दोन मजल्यांची किंमत २०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागधारक आहेत. यामुळे चौकशीसाठी पटेल कुटुंबीयांना बोलावलं जाऊ शकतं, असं ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, दाऊदचा साथीदार ‘मिर्ची’ याच्या कुटुंबाशी कुठलाही संबंध नाही. तसंच प्रफुल्ल पटेलांवरील आरोप धक्कादायक असून त्यांना गोवण्यात आल्याचं पेटल कुटुंबीयांनी म्हटलं होतं.