भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन जेंव्हा चिंता व्यक्त करतात

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या वित्तीय तुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यवस्था वाढत्या वित्तीय तुटीमुळे अत्यंत चिंताजनक स्थितीकडे ढकलली जात आहे, असा इशारा त्यांनी दिला. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन ब्राउन विद्यापीठातील ओपी जिंदाल व्याख्यानमालेदरम्यान बोलत होते.
ते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेच्या गंभीर संकटाचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात असणारी अनिश्चितता. ते म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून भारतीय अर्थव्यवस्थेने लक्षणीय पातळी गाठली आहे. २०१६ च्या पहिल्या तिमाहीत विकास दर ९% होता.’
भारतीय अर्थव्यवस्था सुस्तीच्या टप्प्यातून जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहित तो ५.३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. समस्या कोठे सुरू झाल्या त्याविषयी बोलताना राजन म्हणाले की यापूर्वीचे प्रश्न सुटलेले नाहीत. खरी समस्या म्हणजे विकासाचे नवीन स्रोत शोधण्यात भारत अपयशी ठरला आहे.
राजन म्हणाले, ‘भारतासमोरील आर्थिक संकट एक लक्षण म्हणून पाहिले गेले पाहिजे मूळ कारण म्हणून नव्हे.’ विकास दरातील घसरणीसाठी त्यांनी गुंतवणूक, खप आणि निर्यातीतील सुस्ती तसेच एनबीएफसी क्षेत्रातील संकटाला जबाबदार धरले.