Good News : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट , जम्मू -काश्मीरमधून आलेल्या विस्थापितांनाही दिलासा : प्रकाश जावडेकर

मोदी सरकारनं आज केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली असून या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. नव्या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे. वाढीव भत्ता जुलै २०१९ पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळं सरकारच्या तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या विस्थापितांना साडेपाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही सरकारनं घेतल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली. ‘पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित होऊन देशाच्या विविध भागांत विखुरले गेलेले व पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेल्या ५३०० कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. विस्थापितांच्या बाबतीत झालेली ऐतिहासिक चूक सुधारण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल आहे,’ असं जावडेकर यांनी सांगितलं.