शस्त्र पूजेच्या निमित्ताने राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवले तर बिघडले कुठे ? अमित शहांची काँग्रेसवर टीका

राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचे पाहताच देशभर या प्रकरणावर चौफेर खिल्ली उडविली जात असताना, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राफेल मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय. काँग्रेसने आता राफेलच्या पूजेलाही विरोध सुरू केलाय. तसंच काँग्रेस कलम ३७० च्या बाजूने आहे की विरोधात? हे स्पष्ट करावं, असं अमित शहा म्हणाले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्स दौऱ्यात मंगळवारी भारताला देण्यात येणाऱ्या पहिल्या राफेल विमानाची पूजा केली. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. या टीकेला अमित शहा यांनी हरयाणातील सभेतून प्रत्युत्तर दिलंय. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल राफेलचं शस्त्र पूजन केलं. काँग्रेसला हे आवडलं नाही. विजयादशमीला आपण शस्त्र पूजन करतो ना? मग टीका करताना काँग्रेसने याचं भान राखायला हवं, असं अमित शहा म्हणाले.
राफेल विमान हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे आपल्या देशाची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. राफेल विमान हे हल्ल्यासाठी नाही तर आत्मरक्षणासाठी आहे, असं शहा यांनी स्पष्ट केलंय. विजयादशमीला शस्त्र पूजनाची परंपरा आहे. हे शस्त्र पूजन म्हणजे चांगल्याची वाईटावर मात. तरीही काँग्रेसचा या शस्त्र पूजनाला विरोध का? असा सवाल शहांनी केला. महाराष्ट्र, हरयाणात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यावरून सरकारला घेरावं, हे अजूनही विरोधकांना सुचत नाहीए. विरोधक दिशाहिन झालेत, अशी टीका अमित शहांनी केली.
राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित त्यावर प्रश्न उपस्थित केला. कुठलंही ठोस काम न करता प्रत्येक गोष्टीत ड्रामा करण्यात या सरकारचा हातखंडा आहे, असं दीक्षित म्हणाले. तर असा तमाशा करण्याची गरज नव्हती. आम्ही बोफोर्स तोफा खरेदी केल्या. पण त्या आणण्यासाठी कुणी गेलं नव्हतं. पण हे मंत्री जातात, दिखावा करतात आणि विमानतही बसतात, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती.