अभिव्यक्ती : कलगी तुरा : बुढा होगा तू , और तेरा बाप … म्हातारा मी न इतुका ….

#बाबा गाडे । संस्थापक संपादक । महानायक ऑनलाईन |
खरं तर राजकारण असो कि कोणतेही क्षेत्र असो , कोणी कोणाला म्हातारं म्हटलेलं अजिबात चालत नाही . गेल्या आठवड्यात तर एका महिलेला घरमालकाने “नानी ” म्हटले म्हणून वाद इतका विकोपाला गेला कि, घरमालकाचा पाणउतारा केलेल्या महिलेचा घरमालकाने चक्क खून करून टाकला. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातही म्हातारपणावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे आणि पवार त्याची उत्तरे देत आहेत कि , म्हातारा मी न इतुका ….
विशेष म्हणजे एरवी रस्त्यावर किंवा बाहेर कुठेही जर कुणी एखाद्याला अंकल , काका , आजोबा, आजीबाई , मावशी , काकू म्हटलेलं अजिबात आवडत नाही. ज्या व्यक्तीला वाढत्या वयाचा अंदाज येत नाही आणि अजूनही आपण जवान आहोत, असे वाटते ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर खवळल्याशिवाय राहत नाही. मराठी लवणीमध्येही ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा… ‘ हि लावणी अजूनही हिट आहे ती यामुळेच !! आपल्याकडे राजकारणातील ‘पितामह भीष्म’ म्हणून उपाधी दिले गेलेले शरद पवार यांचेही असेच झाले आहे. त्यांना आजकाल कुणी म्हातारा म्हटलेलं आवडत नाही . त्यांनी स्वतःच आपल्या कित्येक भाषणात ” म्हातारा मी न इतुका ..” असे बोलत त्यांना म्हातारा म्हणणाराना सणसणीत उत्तर दिले आहे. त्याचे कारण त्यांचे राजकीय कार्य आणि उत्साह कुठल्याही तरुणाला लाजविणारा आहे. लोकसभा निवडणूक लागल्यापासून पायाला भिंगरी बांधल्यागत शरद पवार फिरत आहेत. बारामती सोडून त्यांना बरेच दिवस झाले आहेत. पण त्यांची पुन्हा एकदा मस्तवाल बनलेल्या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी सैन्याची जमवाजमव चालू आहे. आणि ते लढण्याच्या तयारीत आहेत. या वयातही.. हा शब्द ओघाने येतो खरा पण राजकारणात वय कधीच महत्वाचं नसतं. किंबहुना राजकारणच जेवढा अनुभव पवारांना आहे तेवढे राजकारणात सध्या मियांव-मियांव आणि डराव- डराव करणारांचे वयही नाही , पण सत्तेचा थाट बाट, तोरा आणि माज वेगळाच असतो हेच खरे.
अर्थात या सर्व टीका -टिप्पणीला शरद पवारांनी अत्यंत संयमाने घेणे गरजेचे आहे कारण ते राजकारणाच्या योग्य दिशेने असल्याने त्यांना डिवचण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत.
खरे तर शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातील एक असे नाव आहे. ” जिनको लोग मानते जादा है, लेकिन जानते कम है . !!” महाराष्ट्रात खूप कमी लोक बाकी राहिले आहेत जे पवारांना जाणतात . त्यांना ‘जाणता राजा’ म्हणणे वेगळे आणि त्यांना “जाणणे” वेगळे. त्यांना आणि त्यांच्या राजकारणाला जे काही दोन-चार पत्रकार लोक जाणतात त्यापैकी ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ( त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, निखिल वागळे , राजदीप सरदेसाई , सुरेश द्वादशीवार असे काही पत्रकार लोक आहेत ज्यांना महाराष्ट्राचे राजकारण चांगले माहित आहे आणि शरद पवारही . पण अलीकडच्या काळात पवारांची माहिती नसलेल्या पत्रकारांची किती फजिती झाली ते ईडी प्रकरणात दिसले आहे ) इथे आपण संजय राऊत यांच्या वक्तव्याची चर्चा करू . ईडीच्या गदारोळात ते ज्या पद्धतीने पवारांच्या बाजूने उभे राहिले आणि पवारांनीही त्यांचे आभार मानले त्याला कारण आहे पण त्याही पेक्षा त्यांनी आपल्या निवेदनात त्यांनी पवारांना उद्धेशून जे ” पितामह भीष्म ” असे विशेषण वापरले त्यातून त्यांची राजकीय परिपक्वता लक्षात येते . अर्थात संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पेक्षाही पवारांना अधिक जाणतात कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेही राजकारण जवळून पहिले आहे आणि शरद पवारांचेही. पवारांना डिवचणाऱ्या पत्रकारांनी आधी पवार प्रकरण समजून घेणे महत्वाचे आहे.
थोडक्यात काय तर शरद पवार खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील राजकारणाचे ” बाप ” आहेत हे कोणलाही नाकारता येत नाही. खरे तर ” पवार आणि राजकारण ” हे दोन शब्द त्यांच्यासाठी वेगळे नाहीत. पवार म्हणजेच राजकारण आणि राजकारण म्हणजे पवार असे म्हटले तरी त्यात काहीही अतिशयोक्ती नाही. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा यांनाही त्यांचे राजकारण समजले नाही. मुळात पवार हे धुरंधर आणि अत्यंत महत्वाकांक्षी राजकारणी आहेत. अर्थात त्यांचे स्वतःचे काही अंदाज चुकल्याने ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकले नाही अन्यथा ते केंव्हाच देशाचे पहिले मराठी पंतप्रधान झाले असते.
इंदिरा गांधी यांच्या काळात उदयास आलेले पवार, राजीव गांधी यांच्या काळात चांगलेच बहरले , फुला -फळाला आले पण त्यांना राजकारणात अंतिमतः पाहिजे होते ‘ते’ ते मिळवू शकले नाही. पुढे त्यांची वाट चुकली ती चुकलीच. पवारांचे वैशिष्ठय असे कि ते एकटे पडले असतानाही ते एकटे कधीच राहिले नाहीत. अगदीच पंतप्रधान पदाच्या भोजाला ते शिवू शकले नाही , तरी त्या पदाच्या जवळ ते जाऊन आले आहेत. राजकारणात वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या दंडाला दंड भिडवणारा त्यांच्यासारखा मुरब्बी आणि धुरंधर राजकारणी या शतकात तरी झाला नाही असेच म्हणावे लागेल.
कालपासून मात्र ते भलत्याच चर्चेकडे वळले आहेत . त्याचे असे झाले कि , “काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडे आठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील” “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील” अशी भविष्यवाणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली आणि दोन्हीही काँग्रेसच्या वृद्धत्वाच्या चर्चेला सुरुवात झाली.
खरे तर काँग्रेसवर टीका करणारे लोक काँग्रेसचा उल्लेख ” दिडशे वर्षाची म्हातारी ” असा करतात, पण हे खरे नाही नाही. दीडशे वर्षांपूर्वीच्या काँग्रेसची अनेक शकले झाली आहेत. मुळात सध्याचा इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्षही त्यांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष आहे . पवारच्या काँग्रेससारखाच तो सुद्धा एक काँग्रेसचा तुकडा आहे. त्यामुळे म्हातारी झालेली ना शरद पवारांची आहे ना सुशीलकुमार शिंदे यांची.
परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणतात तसे ‘म्हातारे नेते झाले आहेत पक्ष नाही. त्यांच्या मतानुसार सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष थकलेले नाहीत, थकणारही नाहीत. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेच असे उद्गार काढल्यानंतर त्यांच्या या विधानाची खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी न उडविली तर नवलच म्हणावे लागेल.
मुळात सत्ता कोणत्याही नेत्यांना अधिक जवान बनवते , शक्तिमान बनवते . सत्ता नसतानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस , उद्धव ठाकरे यांचे जुने फोटो , व्हिडीओ काढून बघितले तर हा फरक तुमच्या लक्षात येईल. सत्तेमुळे सत्ताधारी लोक जनतेच्या बळावर आलिशान जीवन जगतात. एसी शिवाय त्यांना बाहेरचा वाराही लागत नाही. शिवाय त्यांचे खाणे-पिणे , बोलणे , राहणे , वागणे सगळे सगळे बदलून जाते. इतकेच काय टक्कल असलेले अनेक राजकारणी लोक विदेशात जाऊन आपल्या टकलावर सरकारी खर्चाने केस उगवून आलेले आहेत. सभेला जाण्यापूर्वी प्रत्येक मोठे नेते आपले ब्युटिशियन सोबत बाळगतात , तेही सरकारी खर्चाने !! सत्ताधाऱ्यांमध्ये आणखी काय काय बदल होतात ? हे तुम्ही बारकाईने पहिले तर तुमच्या लक्षात येईल.
तात्पर्य , सत्ता सत्ताधाऱ्यांना जवान बनवते तर विरोधकांना अकाली वृद्धत्व देते. त्यामुळे ….बुढा होगा तू , और तेरा बाप … असे कोणी एकमेकांना म्हणत असेल तर त्यात नवल ते कसले ? कारण राजकारण हा “सी-सॉ ” चा खेळ आहे कधी एक खाली राहतो तर दुसरा वर …!!
#बाबा गाडे । संस्थापक संपादक । महानायक ऑनलाईन |