Bad News : औरंगाबादचे एसआरपीएफचे जवान दत्तात्रय चव्हाण यांनी राजभवनातील निवासस्थानी स्वतःवर झाडली गोळी

मलबार हिलमधील राजभवनमध्ये एसआरपीएफच्या एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आज सायंकाळी सव्वा सात वाजता ही घटना घडली असून या जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दत्तात्रय चव्हाण असे या जवानाचे नाव असून त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागे कौटुंबिक कारण असल्याचे सांगण्यात आले. मात्र यासंदर्भात काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.
दत्तात्रय चव्हाण औरंगाबादचा रहिवासी आहे. आज सायंकाळी सव्वा सात वाजता राजभवनातील सर्व्हंट क्वाटर्समध्ये त्याने हनुवटीखाली बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चव्हाणने स्वत:वर गोळी झाडल्यानंतर गोळी झाडण्याचा आवाज आल्याने इतर जवानांनी त्याच्या रुमकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यामुळे त्याला तातडीने आधी एलिझाबेथ रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याची रवानगी मुंबई रुग्णालयात करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांच्याकडे पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यांनी कौटुंबिक कारणावरुन आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.