एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना राज ठाकरे यांच्या पत्नीच्या कारला अपघात

ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याचं वृत्त आहे. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये राज यांच्या पत्नी शर्मिला यांच्या कारचाही समावेश आहे. अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला आहे तर, चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
एका वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. नवी मुंबईतील सानपाड्याच्या सिग्नलजवळ एक ऑटो रिक्षा अचानक शर्मिला यांच्या कारच्या समोर आली. तिला धडक बसू नये म्हणून ड्रायव्हरना कारचा ब्रेक लावला. त्याचवेळी मागून आलेल्या गाडीनं शर्मिला यांच्या कारला धडक दिली. राज ठाकरे यांची कार त्यावेळी पुढं निघून गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमध्ये शर्मिला यांच्याबरोबरच राज यांची बहीण व सचिव सचिन मोरे हे होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. तर, शर्मिला यांच्यासह इतर सर्वजण दुसऱ्या गाडीनं लगेचच मुंबईच्या दिशेनं रवाना झाले.
येत्या ९ तारखेपासून राज ठाकरे आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. प्रचाराला सुरुवात करण्याआधी ठाकरे घराण्याचं कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीचं दर्शन घेण्यासाठी आज ते सहकुटुंब देवदर्शनाला गेले होते. तिथून परतत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.