Mob Lynching : पंतप्रधानांना पत्र लिहिले म्हणून ” त्या ” ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल , मणि रत्नम, नुराग कश्यप, अपर्णा सेन आदींचा समावेश

देशातील मॉब लिंचिंग घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या बॉलिवूडसह अन्य इंडस्ट्रीजमधील जवळपास ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात इतिहासकार रामचंद्र गुहा, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणि रत्नम, दिग्दर्शक अनुराग कश्यप, बंगाली चित्रपटसृष्टीतील विख्यात दिग्दर्शक व अभिनेत्री अपर्णा सेन यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. देशात मॉब लिंचिंगच्या घटनेत वाढ झाली असून ही चिंतेची बाब आहे, असे म्हणत या ५० जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले होते.
सुधीर कुमार ओझा यांनी दाखल केलेल्या प्रकरणावर सुनावणी करण्यात आल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर या ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर कुमार ओझा यांनी म्हटले की, मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २० ऑगस्ट रोजी ऑर्डर पास केली होती. माझी याचिका दाखल करून घेण्यात आली होती. याची पावती घेऊन सदर पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सुधीर कुमार ओझा यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या व त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या ५० जणांविरोधात मी याचिका दाखल केली होती. देशाचे नाव बदनाम करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले काम करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला आहे. या गुन्ह्यात देशद्रोह, सार्वजनिक ठिकाणी चुकीची माहिती पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे, तसेच शांतता भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही सुधीर ओझा यांनी सांगितले आहे.
बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातील दिग्गज लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुलै महिन्यात खुले पत्र लिहिले होते. मोदींना पत्र पाठवून मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनवणे आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी कायद्यात तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या पत्रात लिहिले होते की, आपले संविधान हे भारताला धर्मनिरपेक्ष गणराज्य असल्याचे सांगते. या ठिकाणी प्रत्येक धर्म, समाज, लिंग, जाती आदिंना एकसमान अधिकार आहे. दलित, मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक समाजाविरोधात होणारी लिंचिंग रोखणे आवश्यक आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटना घडल्यानंतर केवळ टीका करून चालणार नाही तर कायद्यात बदल करावा व आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी कडक पावलं उचलावीत असे या पत्रातून मागणी करण्यात आली होती.
देशभरात अनेक ठिकाणी मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत. तसेच ‘जय श्रीराम’चा नारा देण्यासाठी दबाव आणून तरुणांना मारहाण केल्याच्या घटना घडल्याचेही समोर आले आहे. या घटनांवरून विविध क्षेत्रातील ५० मान्यवरांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असं आवाहन केलं होतं. त्यात अपर्णा सेन, रेवती, कोंकणा सेन यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या मान्यवर मंडळींनी जाणूनबुजून देशाची प्रतिमा मलीन केली आहे, असं ओझा यांनी तक्रारीत म्हटलं होतं.