पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंती दिनी केली भारत हागणदरी मुक्त झाल्याची घोषणा

महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाबरोबरच स्वच्छाग्रहाचाही आग्रह धरला होता. बापूंच्या आवाहनानंतर सत्याग्रहासाठी लोक जसे पुढे आले होते, तसेच कोट्यवधी लोक स्वच्छाग्रहासाठी पुढे आले आहेत. या चळवळीमुळेच भारत हागणदरी मुक्त झाला आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादेतील साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर एका पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि लहान मुलांशी गप्पाही मारल्या. त्यानंतर त्यांनी साबरमती रिव्हर फ्रंटला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमाला संबोधित करताना महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त खास तयार करण्यात आलेल्या ४९ ग्रॅम शुद्ध चांदीच्या नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं लोकार्पण केलं.
आज गांधी जयंतीनिमित्त आयोजित सभेला मार्गदर्शन करताना मोदींनी भारत हागणदरी मुक्त झाल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि , महात्मा गांधी यांची जयंती जगभर साजरी केली जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाने गांधीजींवरील टपाल तिकीट जारी केलं आहे, साबरमती आश्रमात मी यापूर्वीही अनेकदा आलो. पण यावेळी मला साबरमती आश्रमात येऊन एक नवीन ऊर्जा मिळाली, असं मोदी म्हणाले. ग्रामीण भारताने स्वत:ला हागणदरी मुक्त केलं आहे. त्याबद्दल ग्रामीण भागातील जनता आणि सरपंचांचं मी विशेष आभार मानतो. स्वातंत्र्याच्या काळात गांधीजींच्या एका आवाहानानंतर लाखो लोकांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. त्याचप्रमाणे स्वच्छाग्रहासाठीही लाखो लोकांनी एका आवाहनानंतर मोठं योगदान दिलं, असं त्यांनी सांगितलं.
वय काहीही असो, सामाजिक आणि आर्थिक स्थिती काहीही असो प्रत्येकाने हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन ही आत्मसन्मानाची चळवळ बनवली. पूर्वी शौचालयाचा विषय काढला तरी किळस यायची. आता हागणदरी मुक्त होणं ही देशाची चळवळ झाली. स्वच्छता मोहिमेमुळे देशातील जनतेच्या विचारात बदल झाला, असंही ते म्हणाले. आपल्या या यशामुळे जगही अचंबित झाल्याचं सांगताना स्वच्छता अभियानामुळे ७५ लाख रोजगारांची निर्मिती झाली असून त्याचा भाग गावखेड्यातील लोकांना झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अस्वच्छतेमुळे रोगराई निर्माण व्हायची. त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसायचा. रोगराईमुळे आजारी पडल्याने त्यांना आर्थिक फटका बसायचा. त्यांचा पैसा नाहक खर्च व्हायचा. मात्र स्वच्छता अभियानामुळे रोगराईही दूर झाली आहे. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं असून ग्रामीण भागातील लोकांच्या नाहक होणाऱ्या खर्चात बचतही झाली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.