जगात पाच वर्षानंतर वाढला भारताचा मान… १३० कोटी नागरिकांमुळे झाले शक्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमेरिका दौऱ्याहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज भारतात आगमन झाले. मागील पाच वर्षात जगात भारताचा मान वाढला असून देशातील १३० कोटी नागरिकांमुळे हे शक्य झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री, भाजप खासदार, नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे पालम विमानतळावर उत्साहात स्वागत केले. या स्वागतामुळे भारवलेल्या पंतप्रधान मोदी यांनी हे स्वागत अविस्मर्णीय असल्याचे म्हटले.
आपल्या अमेरिका दौऱ्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले, २०१४ नंतर मी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत सहभागी झालो. या पाच वर्षात मोठा बदल झाला असून भारताबद्दल जगात आदर मान सन्मान वाढला आहे. देशातील १३० कोटी जनतेने एक मजबूत सरकार बनवले आहे. त्याच्या परिणामी हे शक्य झाले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
हाउडी मोदी या कार्यक्रमात अनिवासी भारतीयांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे त्याची चर्चा होत आहे. ह्युस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रम भव्यतेने होणे ही मोठी गोष्ट असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह रिपब्लिक पक्षासह डेमोक्रेटीक पक्षचेही नेते उपस्थित होते. न्यूयॉर्कमध्येही संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या जगभरातील नेत्यांच्या तोंडी हाउडी मोदीची चर्चा होती असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी तीन वर्षापूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचीही आठवण काढली. तीन वर्षांपूर्वी आपण रात्रभर झोपलो नव्हतो. दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला करुन वीर जवानांनी भारताची ताकद दाखवून दिली होती. आपण जवानांच्या शौर्याला सलाम करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.