अजीत पवार यांना बारामतीतून उमेदवारी, शरद पवारांचे शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीतील आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या नाट्यावर पडदा पडल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांची बारामतीतील उमेदवारी जाहीर केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादांशिवाय पर्याय नाही. त्यांनी नाही म्हटलं तरी बारामतीतील लोकच त्यांना घरातून बाहेर काढून निवडणुकीला उभे करतील. लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यामुळे बारामतीतून तेच लढतील, असं जयंत पाटील म्हणाले. तर जयंत पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. माझ्या उमेदवारीबाबत ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं अजित पवार यांनी सांगितले. तसेच आपल्या उमेदवारीवर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिखर बँकेच्या संचालक मंडळावर आम्ही होतो, म्हणूनच पवार साहेबांना टार्गेट केलं जात असल्याचा पुनरुच्चार केला, चौकश्या झाल्या पाहिजेत. चौकश्या झाल्यावरच सत्यबाहेर पडेल. आमच्या चुका असतील तर कारवाईही होईल, असंही अजित पवार म्हणाले.