पॅन आणि आधार क्रमांक ३० सप्टेंबरपर्यंत लिंक करा अन्यथा १ ऑक्टोबरपासून पॅन कार्ड होईल निष्क्रिय

पॅन आणि आधार क्रमांक ३० सप्टेंबरपर्यंत लिंक केला नाही तर १ ऑक्टोबरपासून तुमचे पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय होईल. याआधी पॅन क्रमांक मुदत दिलेल्या तारखेपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक केले नाही तर ते इनव्हॅलिड (अमान्य) मानले जाईल, असा नियम होता.
पॅन कार्ड इनव्हॅलिड (अमान्य) म्हणजेच, तुमच्याकडे पॅन कार्ड नाही असं मानलं जातं, तर इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच जोपर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक करत नाहीत, तोपर्यंत ते वापरता येणार नाही. मात्र, सरकारने इन-ऑपरेटिव्ह म्हणजे, नक्की काय कार्यवाही होईल, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पॅन कार्ड दिलेल्या मुदतीत आधारशी लिंक केले नाही तर ते अमान्य असेल. जुलै २०१९मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन-आधार लिंक करण्याच्या नियमांत बदल करण्यात आले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ३१ मार्च २०१९ रोजी पॅन आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. पॅन-आधार लिंक करण्यासंबंधीचा नियम १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. पॅन-आधार क्रमांक दिलेल्या मुदतीत लिंक केला नाही तर पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह मानले जाईल.
एनए शाह असोसिएट्सचे भागीदार गोपाल बोहरा म्हणाले, की ‘पॅन इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय झाले तर पुढे काय, याबाबत सरकारकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच तुमच्याकडे पॅन कार्ड नाही असं मानलं जाऊ शकतं. त्यामुळं पॅन कार्ड क्रमांक अनिवार्य असलेल्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.’ एका आयटीआरसंबंधित माहिती देणाऱ्या वेबसाइटचे संस्थापक आणि सीईओ अभिषेक सोनी यांनी सांगितलं की, ‘उत्पन्न कर कायद्यानुसार ३० सप्टेंबर २०१९पर्यंत पॅन आधारशी लिंक करणं अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीत पॅन आधारशी न जोडल्यास पॅन इन-ऑपरेटिव्ह होईल. याचा अर्थ करदाते पॅनचा वापर करू शकत नाहीत.’