भाजप -सेना युतीविषयी आणि नारायण राणे यांच्याविषयी काय बोलले मुख्यमंत्री ?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप- सेनेची युती होईल कि नाही याचा सस्पेन्स वाढला असून , राज्यात भारतीय जनता पक्षाचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील असे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीच्या विषयाला बगल देत जाहीर केले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युतीची चिंता आम्हालाही असल्याचे म्हटले आहे. युतीची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित होईल असेही स्पष्ट केले आहे. युतीबाबत लवकरच चर्चा सुरू होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारल्यानंतर, राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारे घेतलेल्या विविध निर्णयांचे स्वागत केले. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.
कॉर्पोरट टॅक्स कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मागणी सातत्याने आपल्या देशातील अर्थतज्ञही करत होते. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी ट्रे़ड वॉरचा ट्रिपल डाऊन इफेक्ट भारताला परवडण्यासारखा नाही. सरकारने टॅक्स कमी करण्याची हिम्मत दाखवली. या निर्णयाचा महाराष्ट्राला मोठा फायदा आहे. गेल्या २ वर्षांत जागतिक कंपन्या महाराष्ट्रात आल्या. अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरमुळे भारतातील गुंतवणूक वाढत असून २२ टक्क्यांचा सर्वात मोठा फायदा राज्याला होईल.
भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर पहिल्यांदा सरकारने निर्णय घेतला की रेपो रेट कमी झाल्यानंतर ग्राहकालाही त्याचा थेट फायदा व्हावा. हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याबरोबरच, ७० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली गेल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्ज देण्याची क्षमता ५ लाख कोटींनी वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय, १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचाही केंद्राचा मोठा निर्णय असून यामुळे बँकांच्या तोट्यात घट होऊन नफा वाढणार असल्याचेही ते म्हणाले.
येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीनंतर कंपन्यांना १५ टक्के कॉर्पोरेट टॅक्स लावणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. वाचलेल्या करामुळे कंपन्यांचे पैसे वाचणार असून तो पैसा कंपन्यांसाठी गुतवणुकीसाठी उपयोगी पडेल आणि यामुळेकंपन्यांची परिस्थिती अधिक सुधारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.