संघाच्या सर्वेक्षणात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा लग्न करून राहणाऱ्या महिला अधिक आनंदी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुण्यातील दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राद्वारे हा सर्व्हे करण्यात आला असून या सर्व्हेनुसार लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा रितीरिवाजानुसार लग्न झालेल्या महिला अधिक आनंदी असल्याचं या सर्व्हेत आढळून आलं आहे. हा सर्व्हे अहवाल येत्या मंगळवारी जारी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं.
या महिन्यात संघाची राजस्थानच्या पुष्करमध्ये एक बैठक पार पडली, त्यात या सर्व्हे अहवालावर चर्चा करण्यात आल्याचंही सांगण्यात येतं. लग्न झालेल्या महिला सर्वाधिक आनंदी असतात. त्या तुलनेत लिव्ह इन रिलेशनशीपमधील महिला जास्त आनंदी नसतात, असं संघाच्या सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या मंगळवारी विदेशी मीडियासोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर हा अहवाल जारी करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं.
संघाबाबत विदेशी मीडियामध्ये अनेक संभ्रम आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे संभ्रम आहेत. त्यामुळे संघ काय आहे? संघाची कार्यप्रणाली काय आहे? तसेच संघाची धोरणं आणि भूमिका काय आहे? याबाबत भागवत विदेशी मीडियासमोर व्याख्यान देणार आहेत. त्यानंतर ते विदेशी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरही देणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाची बातमी देण्यास संघाने मनाई केली आहे.