सांगली जिल्ह्यात स्वाभिमानीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या !!

सांगली जिल्ह्यातील ताकारी-कुंडल या मार्गावरील दह्यारी फाट्यानजीक या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील ताफ्यांसमोर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकाव्याने ताफ्यासमोर येत अंडी आणि कडकनाथ कोंबड्या फेकल्या. स्वाभिमानीचे कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरल्याने पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली होती.
सध्या राज्यात गाजत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेल्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच दूध सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी द्यावे आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. कोंबड्या उपाशी मरू देण्यापेक्षा कोंबड्या मुख्यमंत्री यांच्या गाडीवर फेकल्या हे योग्यच असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरूवात झाली तेंव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी परिषदेची प्रदेश उपाध्यक्ष शर्मिला सुभाष येवले यांनी ‘सीएम गो बॅक’च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकला होता. शर्मिला सुभाष येवले यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मिला सध्या फरार आहेत. शर्मिला या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुभाष येवले यांच्या कन्या आहेत. त्यांच्या मातोश्री मनीषा या मधुकर पिचड यांच्या अगस्ती साखर कारखान्यात संचालिका आहेत.