पक्षांतर करणारांना जनताच धडा शिकवेल , शरद पवार यांचे टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजप व शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येऊन पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा समाचार जनताच घेईल, अशा शब्दांत त्यांनी पक्षांतर करणारांवर टीका केली. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की, काहीजण चुकीच्या वाटेवर जातील, असे वाटले नव्हते. पण, तसं झालं आहे. आता त्याची चिंता करण्याचे कारण नाही. महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचं राज्य आहे. येथील लोक स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. म्हणूनच ही जनता जेव्हा मतदान करेल, तेव्हा पळपुट्यांचा नक्कीच समाचार घेईल. दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक घेऊन ज्यांनी तह केला त्यांना धडा मिळेल, अशा शब्दांत पवारांनी राष्ट्रवादीची साथ सोडणाऱ्यांवर तोफ डागली.
शरद पवारांनी राज्य सरकारवरही टीका केली. राज्यात दरवर्षी १६ हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत. हातचे रोजगारही जात आहेत. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली त्यांच्या पदराखाली जाण्याचा नाही तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याचा हा काळ आहे, असे आवाहनही पवारांनी केले. महापुरामुळे कोल्हापूर, सांगलीत हजारो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेती, व्यवहारही धुळीस मिळाले आहेत. तिथे केवळ काही तासांची भेट देऊन नंतर मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. तेथील बांधव संकटात असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत फिरत आहेत, अशी टीकाही पवारांनी केली.