‘एक देश, एक भाषा’ : कमल हसन यांचा गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला बोल !!

प्रसिद्ध सिने अभिनेते कमल हासन यांनी सोमवारी ‘एक देश, एक भाषा’ साठी प्रोत्साहन देण्याच्या केंद्राच्या भूमिकेला आव्हान दिले आहे. कमल हासन यांनी एक व्हिडिओ जारी करत अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते या व्हिडिओत म्हणाले, ‘भारतात १९५० साली विविधतेत एकतेचं आश्वासन देत संघराज्य स्थापन झालं आणि आता कोणी शाह, सुल्तान किंवा सम्राट ते नाकारू शकत नाही.’
राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त केलेल्या भाषणात अमित शहा यांनी ‘एक राष्ट्र एक भाषेचा’ नारा दिला होता. हिंदीला राष्ट्रीय भाषा बनवण्याचं आवाहन शाह यांनी भाषणात केलं होतं. व्हिडिओत कमल हासन म्हणतात की ते सर्व भाषांचा सन्मान करतात, पण त्यांची मातृभाषा नेहमी तामिळच राहणार. मक्कल निधी मैयम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी सोमवारी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ जारी केला. ‘यावेळी पुन्हा एकदा भाषेसाठी आंदोलन होईल आणि ते जल्लीकट्टू आंदोलनापेक्षाही मोठं असेल. तामिळनाडूला अशा लढाईची गरज आहे,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, तामिळनाडूचा प्रमुख पक्ष डीएमकेचे नेते एम. के. स्टालिन यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार आपल्या धोरणांमुळे तामिळनाडूला सापत्न वागणूक देत आहे आणि येथे बळजबरीने हिंदी भाषा थोपवली जात आहे, असे ते म्हणाले. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री डी. वी. सदानंत गौडा यांनीही हिंदी सर्वांना एकत्र करणारी भाषा असली तरी ती प्रादेशिक भाषांची गळचेपी करू शकत नसल्याचं म्हटलं आहे.