विधानसभा निवडणुकीवर ‘मनसे’ बहिष्कार टाकण्याच्या ‘मूड’मध्ये , अर्थव्यवस्था बिकट , पैसे जपून वापरण्याचा कार्यकर्त्यांना राज यांचा सल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढता राज्यभरात भाजपच्या विरोधात प्रचार केला. यावेळी मनसेचा विधानसभा निवडणूकही न लढण्याचा सूर पाहायला मिळतोय. कारण, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी निवडणूक न लढण्याबाबत सूर व्यक्त केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला. विशेष म्हणजे स्वतःकडचे पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.
दरम्यान आजच्या बैठकीत काय निर्णय झाला आणि मनसेची विधानसभेत नेमकी काय भूमिका असेल ? याची माहिती स्वतः राज ठाकरे देतील असे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु केलं होतं. यासाठी त्यांनी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची भेटही घेतली. मतपत्रिकांवर निवडणूक न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. यानंतर मनसे आता स्वतःच निवडणूक न लढण्याच्या पावित्र्यात असल्याचं दिसत आहे.
या कठीण आर्थिक परिस्थितीत निवडणूक लढवणेही कठीण असल्याचं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी बैठकीत केल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणूक लढायची झाल्यास उमेदवाराला पक्षाकडून आर्थिक पाठबळ मिळणं कठीण असल्याचं यातून स्पष्ट झाल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, राज ठाकरे यांचा निवडणूक न लढण्याचा सूर पाहाता बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही सूर मिसळला. पण काही पदाधिकाऱ्यांची आजही निवडणूक लढण्याची भावना आहे. काही जागा लढवाव्यात अशी काही पदाधिकऱ्यांची भावना असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काही जागा लढून त्या सर्व जागांवर पराभव झाल्यास पक्षाची नाचक्की होण्याची भीती बैठकीत व्यक्त झाली. सध्या आपला देश रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि अरब राष्ट्र चालवत आहेत, असं मत राज ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केलं. संघालाही देशात सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज येत नाही. आर्थिक संकटामुळे देशातील उद्योगपतीही भीतीखाली आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी काही उद्योगपतींची नावंही घेतली.
दरम्यान, बैठकीत निवडणूक लढण्याबाबत राज ठाकरेंनी अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यांनी केवळ पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. मनसे लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नव्हता. राज ठाकरे यांनी एकप्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह या दोघांना थेट विरोध करत, राज ठाकरेंनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.