राष्ट्वादीच्या त्यागाबद्दल अखेर डॉ. पदमसिहांनी काय दिले सुप्रिया सुळे यांना उत्तर ?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे निकटवर्तीय राहिलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबातील वाद चांगलाच चिघळला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर डॉ.पद्मसिंह पाटील यांचे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पक्षांतर्गत कुरघोड्यांना पायबंद घातला असता तर पक्षावर ही वेळ आली नसती, असा टोला डॉ.पाटील यांनी लगावला आहे.
‘सुप्रिया मला मुलीसारख्या आहेत. त्यांनी माझी काळजी व्यक्त करताना वस्तुस्थितीला धरून मत व्यक्त केले असते तर आनंद वाटला असता. राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी मिळून जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पक्षबदलाचा आग्रह धरला होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून राणांच्या पक्षांतराचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी मी स्वत: तुळजापूरपर्यंत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना आशिर्वाद दिले होते. तत्पूर्वी ३१ ऑगस्टला झालेल्या मेळाव्यात मी स्वत: राणांना राजकीय वाटचालीस आशीर्वाद दिले होते व ‘राणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’ असे आवाहन समर्थकांना केले होते. २०१४ पासून प्रकृतीच्या कारणामुळे मी राजकारणात सक्रीय नाही. त्यामुळे माझा पक्षप्रवेशाचा प्रश्नच नव्हता. सुप्रियांना देखील हे माहीत आहे, असे असताना त्यांनी माझा पक्षप्रवेश रोखण्याबाबतचे विधान करणे खेदकारक आहे. सुप्रियांनी माझ्यापेक्षा पक्षातील नेत्यांची काळजी घेतली असती, पक्षांतर्गत कुरघोड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती, असे पद्मसिंह पाटील यांनी म्हटले आहे.