‘अमित शहा यांच्या ” एक भाषा , एक देश ” घोषणेमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

लोकसभा निवडणुकांनंतर देशाच्या गृहमंत्रीपदी बसलेल्या अमित शहांनी नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा व्हायला हवी’, असं वक्तव्य अमित शहांनी केलं आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला असून ट्वीटरवर अमित शहांच्या या वक्तव्याला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. त्याशिवाय ममता बॅनर्जी, असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून देखील विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदी दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये अमित शहांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, अमित शहांच्या या वक्तव्याचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांकडून यावर धम्माल ट्वीट होऊ लागले आहेत.
यावेळी बोलताना अमित शहांनी परकीय भाषांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी हिंदी राष्ट्रभाषा होण्याची गरज व्यक्त केली आहे. ‘भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. ती आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. पण देशात एक कोणतीतरी भाषा अशी असयला हवी, जिच्यामुळे परदेशी भाषा आपल्या देशावर अतिक्रमण करू शकणार नाही. आणि त्यासाठीच हिंदी राष्ट्रभाषा असायला हवी’, असं अमित शहा यावेळी म्हणाले. इतकंच नाही, यासंदर्भात ट्वीट करताना त्यांनी थेट असाही दावा केला की, ‘राज्यघटनेच्या निर्मात्यांनी त्याच कारणासाठी हिंदीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे.’