माध्यमांच्या दबावामुळे अखेर भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांची एसआयटीकडून सात तास कसून चौकशी

बलात्काराचा आरोप असणारे भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांची गुरुवारी रात्री पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी सार्वजनिकपणे आरोप करत ब्लॅकमेल तसंच वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांकडून ही चौकशी करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांची जवळपास सात तास चौकशी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीकडून (एसआयटी) ही चौकशी करण्यात आली.
पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांच्या नावे अनेक आश्रम आणि शैक्षणिक संस्था आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ६ वाजता पोलिसांनी सुरु केलली चौकशी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती. यावेळी त्यांनी मुलीकडून करण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारण्यात आलं. मुलीने आपल्यावर बलात्कार करत त्याचा व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं, तसंत त्या व्हिडीओची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याचं आरोपात म्हटलं आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्या वकिलांनी आपण पोलिसांनी तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान एसआयटीने आपण मुलीची १५ तास चौकशी केल्याचं वृत्त फेटाळलं आहे. तसंच स्वामी चिन्मयानंद यांची चौकशी कऱण्यापासून पळ काढत असल्याचा आरोपही फेटाळला आहे. “आम्ही स्वामी चिन्मयानंद यांची चौकशी करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही त्यांना तीन दिवसांपुर्वी समन्स बजावलं होतं. पण आम्हाला तब्बेतीचं कारण सांगण्यात आलं. पुढील काही दिवस त्यांची चौकशी सुरु राहिल,” अशी माहिती एसआयटीने दिली आहे.