Aurangabad : लाचखोर लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयातील तक्रारदार कर्मचा-याचा भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी १० हजाराची लाच स्विकारणा-या लाचखोर लेखाधिका-यास अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.११) रंगेहात गजाआड केले. कौतिक यादवराव काचोळे (वय ५६) असे लाचखोर लेखाधिका-याचे नाव असल्याचे एसीबीच्या सुत्रांनी सांगितले.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयातील ५७ वर्षीय तक्रारदार कर्मचाNयाने नागपूर येथील महालेखापाल कार्यालयाकडून भविष्य निर्वाह निधी मिळावा यासाठी अर्ज केला होता. भविष्य निर्वाह निधी मंजूर झाल्यावर धनादेश देण्यासाठी लेखाधिकारी कौतिक काचोळे याने १० हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.
दरम्यान, अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, जमादार विजय बम्हदे, रविंद्र अंबेकर, सुनील पाटील, चांगदेव बागूल आदींच्या पथकाने बुधवारी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयात सापळा रचून लाचखोर कौतिक काचोळे याला गजाआड केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.