महाराष्ट्र विधानसभा : केंव्हाही जाहीर होऊ शकते आचारसंहिता !!

महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांत याचवर्षी विधानसभा निवडणुका होत असून प्रथम महाराष्ट्र व हरयाणात तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
विद्यमान १३ व्या विधानसभेची पहिली विधीमंडळ बैठक १० नोव्हेंबर २०१४ रोजी झाली होती. विधानसभेचा कार्यकाळ हा ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधीच १४ वी विधानसभा गठित होणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता निवडणुक आयोग आपले वेळापत्रक जाहीर करणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत केवळ निवडणुकीचा आढावा, मतदारांची माहिती दिली आहे.
२०१४ साली १२ सप्टेंबर रोजी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली होती. तर २० सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी झाली. त्यानंतर विधानसभेसाठी १५ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात सर्व २८८ मतदारसंघात निवडणूक झाली होती. तर १९ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता.
महाराष्ट्र व हरयाणा या दोन्ही राज्यांत मतदान व मतमोजणी प्रक्रिया दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१४ मध्ये या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २० सप्टेंबर रोजी करण्यात आली होती तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निकाल १९ ऑक्टोबर रोजी लागले होते. २३ ऑक्टोबर रोजी दिवाळी होती. २०१४ मध्ये नक्षलग्रस्त झारखंडच्या निवडणुका २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या दरम्यान ५ टप्प्यांत झाल्या होत्या.
दरम्यान, महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन नुकताच आढावा घेतला. त्यानंतर आज आयोगाच्या पथकाने हरयाणात जाऊन तेथील मुख्य निवडणूक आयुक्तांशी विस्तृत चर्चा केली. दोन्ही राज्यांच्या गृह विभागांशी तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाशीही चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे.
अशीही चर्चा …
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे होती. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप १९ सप्टेंबरला नाशिक येथे होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः उपस्थित राहणार असून तपोवन येथील सभेला दोन्ही नेते संबोधित करणार आहेत. मोदींच्या या सभेनंतरच आचारसंहितेची घोषणा होईल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. आचारसंहितेचा अंदाज घेऊन राज्य सरकारने मागच्या आठवड्यात विकास कामांच्या निर्णयांचा एकच धडाका लावला होता. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ३७ तर त्या अगोदर झालेल्या बैठकीत २५ विविध विकास कामांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली होती. आचारसंहितेपुर्वी योजनांच्या घोषणा करण्याचा सरकारचा वेग वाढल्याचे दिसत आहे.