प्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत यायचंच नव्हतं , धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत न करता भाजपाला मदत करण्याचा त्यांचा अजेंडा : काँग्रेस

प्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत यायचंच नव्हतं. यामुळे त्यांनी कधीच चर्चा केली नाही धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत न करता भाजपाला मदत करण्याचा त्यांचा अजेंडा आहे आणि हे सर्व कशासाठी करत आहेत हे पुढच्या काळात आपण सांगूच असा इशाराही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. अवधूत तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना ते म्हणाले कि , काकाच्या आशीर्वादानेच पुतणे राजकारणात मोठे झाले आहेत हे अवधूत तटकरे विसरले त्यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल अशी टीकाही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाचारी पत्करत भाजपसोबत युती करावी लागतेय. त्यामुळे अनेक बडे नेते नाराज आहेत. ‘युती’चे हे बडे नेते तिकिटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करून मोदी यांच्या शंभर दिवसाच्या सरकारने देशात मंदिर बनवलं, सर्व बेरोजगारी संपवली, विकास केला असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला. सरकार फक्त प्रचार करत असल्याचंही ते म्हणाले.
चर्चा महायुतीच्या जागा वाटपाची
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी ‘युती’चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झाली असून या आधी प्राथमिक चर्चा झाली असली तरी ही चर्चा अंतिम फॉर्म्युला ठरविण्यासाठी असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे . चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असून अजुन काही फेऱ्या होणार आहेत. झालेल्या चर्चेचा तपशील दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या ज्येष्ठ नेत्यांना देत आहेत. अंतिम तोडगा निघाल्यानंतरच भाजपचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याचे वृत्त असून गणेश विसर्जनापूर्वी हा तोडगा निघणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा करत असून शिवसेनेकडून सुभाष देसाई त्यात सहभागी आहेत. आज या सर्व नेत्यांमध्ये चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असून मित्र पक्षांना द्यावयाच्या जागा आणि त्यानंतर दोन्ही पक्षांनी लढायच्या जागा, काही जागांची अदलाबदल अशा सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.