Aurangabad : श्रींच्या विसर्जनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

श्रींच्या विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे. मोहर्रम आणि गणेशोत्सव एकाचवेळी असल्याने शहरात पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त होता. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंदोबस्ताची देखील जबाबदारी पोलिसांवर येऊन ठेपली होती.
दोन दिवसांनी श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला संस्थान गणपतीपासून सकाळी अकरा वाजता सुरूवात होणार आहे. त्यासाठी शहर पोलिस दल सक्रिय झाले आहे.
पोलिस आयुक्त, चार उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त, ३३ पोलिस निरीक्षक, १११ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, दोन हजार ५३ पुरूष कर्मचारी आणि २२७ महिला कर्मचारींचा यात समावेश आहे. याशिवाय रॅपिड अॅक्शन फोर्स आणि राज्य राखीव बलाची प्रत्येकी एक कंपनी मागविण्यात आली आहे. शहराच्या मुख्य ठिकाणी पाच वॉच टॉवर, ९१ ठिकाणी फिक्स पॉईंट, तीन रोड रोमिओ पथक, तीन बॉम्ब शोधक व नाशक पथक, चाळीस ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच एक मदत केंद्र असून, गुन्हे शाखा आणि विशेष शाखेचे ६० जणांचे पथक साध्या वेषात गस्त घालणार आहेत.