नांदेड : मुखेड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

नांदेडच्या मुखेड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवार (आज दिनांक ७) रोजीच ही घटना घडली. अंकुश केंद्रे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुखे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या वाहनावर चालक म्हणून जामादा अंकुश केंद्रे (वय-४८) कार्यरत होते.
शुक्रवारी ६ सप्टेंबरला गौरी उत्सवासाठी त्यांची पत्नी आणि मुलगा हे दोघे लोहा तालुक्यातील त्यांचे मूळगाव वागदी येथे गेले. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंकुश यांचे कुटुंबीयांशी बोलणे झाले. तसेच आपण पोलीस ठाण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर केंद्रे यांनी शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याचवेळी त्यांची पत्नी आणि मुलगा गावाहून परतही आले होते. अंकुश केंद्रे यांनी आत्महत्या का केली ते समजू शकलेले नाही. १९ जुलै रोजी जमादार आंबेवार यांनीही पोलीस स्टेशन परिसरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
मुखेड पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. दोन वाहनांसाठी चार चालक कार्यरत आहेत. कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यावर कामाचे किंवा अधिकाऱ्याचे दडपण नाही असे पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांनी स्पष्ट केले.