कोल्हापुरात मुसळधार पाऊस , पुन्हा पूरसदृश परिस्थिती , ७५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर आज वाढला आहे. पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे संभाव्य पूरबाधित गावांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर आजही कायम आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८.५ फुटांवर पोहोचली आहे. तर राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून ११,३९६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच स्थानिकांनी योग्य वेळी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेल्यानं २० मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या येथे तैनातदेखील करण्यात आल्या आहेत.