औरंगाबाद : ऑरिस सिटीचे लोकार्पण करताना मोदींनी दिली विविध योजनांची माहिती आणि माता भगिनींना केला नमस्कार !!

सर्व माताभगिनींना माझा नमस्कार. आज गौरी, महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल खूप खूप आभार. आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सुद्धा आहे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. ऑरिस सिटीच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये अनेक कंपन्या येतील. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि औरंगाबाद दौऱ्यावर होते . आपल्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांची प्रशंसा केली. मात्र औरंगाबाद आणि मराठवाड्याला विशेष काहीही मिळाले नाही. मराठवाडा आणि औरंगाबादच्या विकासाबद्दल पंतप्रधान काही ठोस आश्वासन देतील अशी अपेक्षा होती परंतु पंतप्रधानांनी जनतेची निराशाच केली.
शेंद्रा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक सिटीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि महिला व बालककल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं .
यावेळी बोलताना मोदी म्हणाले कि , बचत गटातील प्रत्येक महिलेला स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत एक लाखाचं कर्ज देण्यात येईल. तसेच जनधन खातं असलेल्या महिलांना खात्यात पैसे नसले तरी ५ हजार रुपयांचं कर्ज देण्यात येईल. त्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.
शौचालय आणि पाणी या महिलांच्या दोन प्रमुख समस्या असल्याचं ज्येष्ठ समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी ७०च्या दशकात संसदेत सांगितलं होतं. या समस्या सोडवल्या तर महिलांचाही देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असं लोहिया म्हणाले होते. लोहिया गेले. त्यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली. पण या समस्या काही सुटल्या नाहीत. पण आम्ही सत्तेत येताच या समस्या सोडवण्यावर भर दिला असल्याचं मोदी म्हणाले. पाण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मंत्रालय सुरू केलं असून पाण्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोकणातून मराठवाड्यात पाणी आणणार, मराठवाड्यातला दुष्काळ संपवणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे केली. ६४ हजार किमीची पाईपलाईन उभारली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. चार वर्षांपासून मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे तो दूर करण्याचं लक्ष्य सरकारपुढे आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. औरंगाबादमधून समृद्धी महामार्गही जातोय आहे या महामार्गामुळेही विकास होणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.