आधुनिक पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपये खर्चाची तरतूद : नरेंद्र मोदी

मुंबईतील तीन नव्या मेट्रो मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले , आजच्या घडीला देश ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्या शहरांची निर्मितीही २१ व्या शतकातील जगाप्रमाणं करावी लागणार आहे. याच विचारासह आपलं सरकार पुढील पाच वर्षांत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबईत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मेट्रोच्या तीन मार्गिकांचे भूमिपूजन केले. गायमुख-शिवाजी चौक (मिरा रोड) मेट्रो १० (९.२ किलोमीटर), वडाळा-सीएसटी मेट्रो ११ (१२.८ किलोमीटर) आणि कल्याण-तळोजा मेट्रो १२ (२०.७) या प्रकल्पांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो कोचचेही उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी यांचे कौतुक केले. यावेळी मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख लहान भाऊ असा केला. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले. देशापासून काश्मीरला वेगळे करण्याचा काही जण प्रयत्न करत होते. पण तुम्ही कलम ३७० रद्द करून त्यांना रोखले. काश्मीर आणि श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात, असंही ते म्हणाले. तुमच्या नेतृत्वात चाँद जिंकला. आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे, असंही ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली. देशाला दिशा दाखवणारं मोदींचं नेतृत्व आहे. मोदीजी, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधाल हा विश्वास आहेच. समान नागरी कायदा देखील तुम्ही आणाल हा देखील विश्वास आहे. महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार आहे. पहिली इलेक्ट्रिक बस एसटीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात आणली. मजबूत सरकार पुन्हा येणार आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही; मात्र विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, असं ठाकरे म्हणाले.