महाराष्ट्रातील २५ किल्ले खासगी क्षेत्राला देण्याचा राज्य सरकारचा निर्णय , विरोधकांची सरकारवर टीका

हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील २५ गडकिल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. या वृत्तानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
राज्यातील २५ किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’नं प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीनं अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्यातील २५ गडकिल्ल्यांची निवड केली आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी या किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. किल्ले लग्न समारंभांसाठी भाड्याने दिली जाणार आहेत, असं त्यात म्हटलं आहे. या वृत्तानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
विरोधकांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवताना, ‘गडकिल्ल्यांना हात लावाल, तर याद राखा’, अशा शब्दांत बजावले आहे.