अखेर ” त्या ” २५ किल्ल्यांच्या निर्णयावर बोलले मुख्यमंत्री….

अखेर राज्यातील २५ गडकिल्ले भाड्याने देण्याच्या वृत्तावर देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे बोलताना तत्काळ खुलासा केला असून त्यांनी म्हटले आहे कि , छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, ज्या किल्ल्यांना कोणताही इतिहास नाही, अशा किल्ल्यांबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांसादर्भात कोणत्याही गोष्टींची परवानगी शासनाने दिलेली नाही, असं फडणवीस म्हणाले. ज्या किल्ल्यांना कोणताच इतिहास नाही. ज्यांच्या केवळ चार भिंतीच उरल्या आहेत. अशा किल्ल्यांचा पर्यटनादृष्टीने विचार करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा किल्ल्यांवरही लग्न किंवा इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. या निर्णयाबाबत चुकीचे वृत्त पसरवले जात असल्याचंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संभाजीराजांचे कौतुक केले. संभाजीराजांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी किल्ल्यांच्या संवर्धनाचे चांगले काम केले आहे. इतिहास असलेल्या किल्ल्यांना काहीही धक्का लागणार नाही यावर आमचे लक्ष राहील, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले तसेच पुरातत्त्व विभागाकडे असलेले किल्ले वगळता महसूल विभागाच्या ताब्यात असलेले किल्ले हे पर्यटन विकासासाठी विकसित केले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर महसूल विभागाकडील २५ किल्ले हे खासगी विकासकांना विकासासाठी भाडेतत्वावर देण्याचे धोरण तयार केले जाणार आहे. या किल्ल्यांचे पावित्र्य राखले जाणार असून, ते लग्न समारंभासाठी दिले जाणार नाहीत.’ असे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.