लोकल रेल्वेसेवा ठप्प झाल्याने कार्यालयातून सुटलेल्या मुंबईकरांची दैना ,महापालिकेच्यावतीने तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था

तब्बल सात तासाच्या खोळंब्यानंतर अखेर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. रात्री साडे नऊ वाजता चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पहाटे पासून सुरू असलेल्या पावसामुळे दुपारी तीननंतर पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला. चर्चगेट ते अंधेरीपर्यंतची लोकल पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तसेच अंधेरीहून विरारकडे जाणाऱ्या लोकलचाही मोठा खोळंबा झाला होता. त्यामुळे चर्चगेटकडे येणारे आणि विरारकडे जाणारे प्रवासी मध्येच लटकले होते. रेल्वेचा खोळंबा आणि पावसाची सुरू असलेली रिपरिप यामुळे प्रवाशी चांगलेच वैतागले होते.
दरम्यान रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १४५ शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासोबतच पिण्याचे पाणी, सतरंजी, बसण्यासाठी खुर्ची किंवा बाक इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळांमध्ये महानगर पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दोन तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अंधेरीहून चर्चगेटसाठी पहिली लोकल सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र अंधेरी -चर्चगेच दरम्यान धावणाऱ्या लोकलची अपूरी संख्या, दोन गाड्यांमधील मोठं अंतर आणि प्रचंड गर्दी यामुळे प्रवाशांचा संतापाचा पारा आणखीनच चढला होता. रात्रीपर्यंत पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. मात्र साडे नऊ वाजता पश्चिम रेल्वेने जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल सुरू केल्याने शेकडो प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
मुंबई -ठाण्याला पावसाने आजही झोडपून काढल्याने संपूर्ण मुंबईची दाणादाण उडाली. सकाळी ११ नंतर मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांना भरपावसात रेल्वे रुळावरून पायपीट करावी लागली. दरम्यान सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर प्रवाशांची तारांबळ उडाली. तिन्ही मार्गावरील लोकल संध्याकाळीही सुरू न झाल्याने तिन्ही मार्गांवरिल स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. मध्य रेल्वेने लोकल कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याचं थेट सांगून टाकल्याने प्रवाशांचा संतापाचा पारा चढला. सीएसएमटी स्टेशनवर तर प्रवाशांनी ‘मध्य रेल्वे चोर है’च्या घोषणा देत संतापाला वाट मोकळी करून दिली. मात्र रेल्वेच सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झाल्याने हतबल झालेल्या मुंबईकरांनी दुसरा पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अनेक प्रवाशांनी बेस्ट डेपो गाठत बसमधून घरी जाण्याचा प्रयत्न केला, पण बेस्टच्याही ७७ बसेस पाण्यामुळे बंद पडल्याने रस्त्यांवर कमी प्रमाणात बस धावत होत्या. परिणामी बसलाही तुफान गर्दी झाली होती.
टॅक्सी आणि रिक्षा चालकांनीही प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा उचलत अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यास सुरुवात केली. जवळचं भाडंही रिक्षा -टॅक्सीचालकांकडून नाकारलं जात होतं. फोर्ट, चर्चगेट, दादर, भायखळा, परळ, माटुंगा, माहीम, अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले परिसरात तर जसजशी रात्र होत होती, तसतशा टॅक्सीही मिळणं बंद झालं होतं. त्यामुळे हताश झालेल्या मुंबईकरांना पुन्हा आसऱ्यासाठी रेल्वे स्थानकांवर यावं लागलं. तर काही प्रवाशांनी पालिका शाळांमध्ये येऊन आराम करणं पसंत केलं. दरम्यान, रात्री साडे नऊ नंतर चर्चगेटवरून लोकल सुरू झाल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता.