गेल्या ७० वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पहिले नाहीत , काँग्रेसच्या महापर्दापाश यात्रेत हल्ला बोल

भारतीय जनता पक्षाने विविध प्रश्न उपस्थित करत केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासने देण्यात येतात. त्याची पूर्ती होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत. स्वतंत्र भारताच्या ७० वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान व मुख्यमंत्री पाहिले नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेसचे राज्य प्रचार समिती प्रमुख, माजी खासदार नाना पटोले यांनी केला.
काँग्रेसकडून काढलेली महापर्दाफाश यात्रा अकोला व वाशीम जिल्हय़ात दाखल झाली असून, विविध ठिकाणच्या सभेत नाना पटोले यांनी सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. सभांना स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, भाजप सरकारने शेतकऱ्यांना कायम वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केवळ घोषणा केल्या, प्रत्यक्षात शेतमालाला समाधानकारक भाव नाही. पीक विम्याचा लाभ नसून, कर्जमाफीत असंख्य चुका असल्याने असंख्य शेतकरी वंचित आहेत. भाजप शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने केवळ ३५० कोटी रुपयांमध्ये देशात स्थिरता आणून रस्ते, वीज, शाळा व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. भाजपकडे एकहाती सत्ता असूनही त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक संकटात लोटला गेला. भाजप सरकारने जनतेला फसवले आहे. त्यामुळे भूलथापा मारणाऱ्या या सरकारला उखडून फेका, असे आवाहन पटोले यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेतून करण्यात येत असलेल्या दाव्यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने ही यात्रा काढल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या सरकारने सर्वाचीच लूट केली. शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत राबवली. आता काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्याने शिक्षक भरतीचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.