“छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ” जागतिक ‘वंडर्सलिस्ट’मध्ये दुसऱ्या स्थानी

जागतिक वारसा आणि सर्वात आश्चर्यकारक स्टेशनांच्या यादीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात सीएसटीएमचाही समावेश केला आहे. या यादीत सीएसटीएम दुसऱ्या तर न्यूयॉर्कचं ग्रँड सेंट्रल टर्मिनल पहिल्या स्थानावर आहे.
या यादीत लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल तिसऱ्या, मॅड्रिडचं अटोचा स्टेशन चौथ्या आणि अँटवर्पमधील अँटवर्प स्टेशन पाचव्या स्थानावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. हे स्टेशन म्हणजे वास्तूकलेचा अद्भूत नमूना असून फेड्रीक विल्यम स्टिव्हन्सने हे स्टेशन बांधलं आहे.
मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित हे स्टेशन आहे. या स्टेशनचं नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं. नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. भारतातलं सर्वात व्यस्त असं हे स्टेशन असून रोज तीन दशलक्ष प्रवासी प्रवास करतात, असा गौरव या संकेतस्थळानं केला आहे. मध्य रेल्वेनंही ट्विट करून ही माहिती दिली आहे.