मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण : एसआयटीची स्थापना आणि हलगर्जीपणा करणारांवर कारवाईचे निर्देश दिल्याने चौथ्या दिवशी झाले पीडितेवर अंत्यसंस्कार

घाटातील संबंधित डॉक्टर आणि चौकशी अधिकारी यांच्यावर कारवाईचे राज्य महिला आयोगाचे आश्वासन , विजया रहाटकर यांनी दिले निर्देश
मुंबईतील चेंबूर भागात चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जालन्यातील तरुणीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराची चौकशी करण्यासाठीचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दिल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्या पोस्टमोर्टमला संमती देऊन आज चौथ्या दिवशी तिच्या पार्थिवावर बेगमपुरा स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात तत्परतेने कारवाई न केल्याने या घटनेचे मुंबई आणि औरंगाबादेत तीव्र पडसाद उमटले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पीडित मुलीच्या भावाला पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याचेही महिला आयोगाने स्पष्ट केले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित तरुणीच्या भावाची आणि कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही रहाटकर यांनी दिले . त्यानंतर रहाटकर यांनी चुनाभट्टी पोलिस स्थानकात जाऊन मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त लख्मी गौतम, पोलिस उपायुक्त शशि मीना आणि पीडित तरुणीचा भाऊ उपस्थित होता.
महिला आयोगाने निर्देशित केल्यानुसार १. पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून या घटनेचा तपास ‘सीबी-सीआयडी’कडे त्वरीत सोपविण्यात येईल. ‘सीबी-सीआयडी’कडून त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जाईल. २. पीडितेच्या भावाला पोलीस संरक्षण दिले जाईल. ३. पोलीस निरीक्षक श्रीमती शिर्के यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल . ४. पीडितेच्या कुटुंबीयांना नीट वागणूक न देणाऱ्या औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार. ५. या घटनेमध्ये ‘मनोधैर्य’ योजनेतंर्गंत पीडितेच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक सहाय्य देण्यात येणार. त्यासाठी सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.
दरम्यान गेल्या जुलै महिन्यात मुंबईत गॅंगरेप ला बळी पडून उपचारा दरम्यान मयत झालेल्या पिडीतेच शवविच्छेदन नातेवाईकांच्या संमतीने आज करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. पिडीतेला न्याय मिळण्याकरता प्रत्येक राजकिय पक्ष आपला कस पणाला लावत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनीही पिडीतेच्या नातेवाईकांना भेटून मयत पिडीतेचे शवविच्छेदन करण्यामागची पोलिसांची भूमीका समजावून सांगितली. दोषींवर या प्रकरणात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला त्यानंतर मयतपिडीतेच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टेम करवून मृतदेह ताब्यात घेऊन बेगमपुरा स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्व प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनीही पोलिसआयुक्त प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात महत्वाची भूमीका पार पाडली